Saturday 11 July 2015

दमलेल्या बाबांची कहाणी …












दमलेल्या बाबांची कहाणी …
"तुम्ही आता मला शिकवणार का? स्व:ताच्या पोरीला सांभाळता येत का ? गेली ना पळून त्या भामट्याबरोबर …… "
मॅनेजर साहेब धनाजीवर ओरडत होते . पूर्ण स्टाफ समोर प्रथमच धनाजीला आज मान खाली घालावी लागली होती तस काही चुकलं न्हवतं त्यांचं तेच समजावून सांगत होते पण मॅनेजर साहेब आज काही ऐकण्याच्या मनस्थितीत न्हवते आणि रागाच्या भरात त्यांनी धनाजीच्या दुखत्या नसवर बोट ठेवलं होतं . धनाजी बिचारे काहीच बोले नाहीत त्यांनी मान खाली घातली आणि गपचूप आपल्या टेबलवर जाऊन बसले . त्यांचे डोळे पाणावले होते , पुन्हा मान वर करून बघायाचीसुद्धा त्यांच्यात हिम्मत न्हवती . आता तर हे धनाजी आणि त्यांच्या पत्नीसाठी रोजच झालं होतं. साधं रस्त्यावरून जरी चालायचं म्हंटला तरी आजूबाजूच्या नजर यांच्याकडे लागायच्या आणि बायका त्यांच्या पत्नीला पाहून खुस्फूस करायच्या ,"ती बघा चाललीय कशी , पोरगी पळून गेलीय त्याच काही नाही …. चांगले संस्कार केले असते तर कशाला अशी वेळ आली असती आणि कशाला पोरगी पळून गेली असती" ,असे एक न अनेक टोमणे त्यांना ऐकवले जात असत आणि धनाजीच्या बाबतीतही काही वेगळं न्हवत त्यांनाही ऑफिसमध्ये हाच अनुभव यायचा रोज . धनाजी आयुष्यभर ताठ मानेने समाजात वावरले पण आता वयाच्या पन्नाशीनंतर त्यांना मान खाली घालून जगायची पाळी आली होती .
आज या प्रकारानंतर ऑफिस सुटल्यावर त्यांना घरी जायची इच्छाच न्हवती म्हणून ते ऑफिसमधून निघाले आणि एका सार्वजनिक बागेत जाऊन एका ठिकाणी बसले , आणि त्यांच्या डोळ्यांसमोरून मुलीच्या आठवणीचा चित्रपट सरकू लागला . मग त्यांना आठवला तो दिवस ज्या दिवशी नामिताचा म्हणजे त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता , त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता . अक्ख्या चाळीत त्यांनी पेढे वाटले होते . किती गोड होती मुलगी ती , तिला कुठे ठेवू आणि कुठे नको अस झाला होतं त्यांना . धनाजी तिची खूप काळजी घेत असत १ मिनिट जरी ती नजरेआड झाली तरी त्यांचा जीव कासावीस होऊन जायचा . तिला जेव्हा पहिला दात आला तो क्षण , तिचं रांगन , घरात पडलेलं तीच पाहिलं पाऊल , तिच्या तोंडून पडलेला "बाबा " हा पहिला शब्द , त्यावेळी त्यांना आकाशही ठेंगण झालं होतं , सगळ काही मनात साठवून ठेवलं होतं त्यांनी मग कधी नमिता शाळेत जाताना रडू लागली कि धनाजी स्वतः तिला खाद्यावर बसवून शाळेत सोडायला जात तेव्हा एखाद्या सिंहासनावर बसल्यासारखे भाव त्या छोट्या नमिताच्या चेहऱ्यावर असायचे. छोटी नमिताही आपल्या लाडक्या बाबाला सोडून कधी राहिली नाही . .
ज्या ज्या गोष्टींचा हट्ट नमुने धरला ते ते सर्वहट्ट त्यांनी ऐपत नसतानाही पुरवले. कारण तिच्या डोळ्यातलं पाणी त्यांना पाहवत न्हवतं .
मग हळू हळू नमिता मोठी होऊ लागली दहावी मध्ये खूप चांगल्या मार्कांनी पास झाली . त्यावेळीही धनाजीला किती आनंद झाला होता . मग ती कॉलेजमध्ये जाऊ लागली . एक दिवस तिने तिच्या लाडक्या बाबांकडे मोबईलचा हट्ट धरला , मग काय धनाजीला नुसत बोलायचाच अवकाश लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन आपला पगार एडव्हान्स मागितला आणि एक छानसा मोबाईल आपल्या लाडक्या लेकीला आणून दिला . हळू हळू नामिताचं अभ्यास सोडून मोबाईल वर बोलन वाढू लागलं . जेव्हा पहाव तेव्हा ती एकतर लपून लपून बोलत तर असायची किंवा मोबाईलवर सतत काहीतरी टाईप करत असायची. हे पाहून धनाजीला आणि त्यांच्या पत्नीला नामिताची खूप काळजी वाटू लागली . त्यांच्या पत्नीने एक दिवस त्यांना सांगितलं कि ," आता आपल्याला आपल्या नमुसाठी एक चांगलं स्थळ शोधून तीच लग्न लावलं पाहिजे . " धनाजीला सुद्धा आपल्या पत्नीचा विचार पटला. तास त्यांनी तिच्यासाठी स्थळं शोधन चालू केलं . आणि बघता बघता एक दिवस नामितासाठी त्यांच्याकडे एक अतिशय चांगल स्थळ चालून आलं . मुलगा दिसायला चांगला होता आणि एका मल्टीन्याशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला होता , त्याच्या घरचेही खूप चागले होते .एका मुलीच्या आई-वडिलांना अजून काय हवं असतं आपल्या मुलीसाठी . आपली मुलगी आयुष्यभर सुखी राहावी एवढंच न !! …
पण नमिताला बहुतेक हे आवडलं न्हवत , या स्थळाबाबत तिची नाराजी सरळ सरळ तिच्या चेहऱ्यावर दिसत होती पण धनाजीला वाटल कि कदाचित आपल्या बाबापासून आपल्याला दूर जाव लागणार म्हणून हिरमुसली असेल पोर .
पण शेवटी जो अनर्थ व्हायचा होता तोच झाला . एक दिवस धनाजी आणि त्यांची पत्नी रात्री शांत झोपले असतानाच , नमिता घर सोडून गेली आणि जाता जाता त्यांच्यासाठी एक चिट्ठी लिहून ठेवून गेलि. सकाळी धनाजींच्या पत्नी लवकर उठल्या आणि सर्व काम आटोपून नमिताला उठवायला तिच्या खोलीत गेल्या तर नमिता आपल्या खोलीत न्हवती संपूर्ण घरभर त्यांनी तिला शोधल पण ती कुठेच दिसली नाही मग तिच्या खोलीतल्या अभ्यासाच्या टेबलवर त्यांना एक चिट्ठी दिसली. त्यांनी ती उघडून वाचली तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली . त्या धावत धनाजीना उठवायला गेल्या आणि रडत रडत धनाजीना त्यांनी उठवलं . आपल्या पत्नीला असं ओक्साबोक्शी रडताना पाहून ते खूप घाबरले आणि म्हणाले ," काय झालं , इतकी रडतेयस का ? सर्व ठीक तर आहे ना . "
मग त्यांच्या पत्नीने त्यांना नामिताची चिट्ठी दाखवली ,आणि म्हणाल्या ,"अहो नमिता कुठेच दिसत नाहीये आणि तिच्या खोलीत हि चिट्ठी मिळाली मला ", ती वाचून धनाजीना खूप मोठा धक्का बसला त्यात लिहिलं होतं ,
" आई -बाबा मला माफ करा मी असं घर सोडून जातेय पण एक कारण आहे , माझ एका मुलावर खूप प्रेम आहे , २ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो , आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे , आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाही . तुम्ही मला न विचारताच २ दिवसात माझ्या लग्नाचा निर्णय घेतलात आणि मला साध विचारलाही नाही . मला खूप वाईट वाटतं कि तुम्ही दोघेही कधीच माझ्या भावनांना समजू शकाला नाहीत आणि म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला . plz तुम्ही विसरून जा कि तुम्हाला एक मुलगी होती म्हणून . …………………नमिता "
धनाजी अजूनही बागेतच बसले होते आणि बघता बघता त्यांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या . खर तर त्यांना खूप रडावसं वाट होतं अगदी मोठ्याने ओरडून ओरडून . ते विचार करत होते कि फक्त २ वर्षापूर्वी जो मुलगा तिला भेटला होता त्याच्यावर तिने इतकं जीवापाड प्रेम केलं पण आपल्या जन्मदात्या बापाच्या २२ वर्षाच्या प्रेमाचं काय? त्याच काहीच मोल न्हवतं का तिच्या नजरेत ? तिच्या डोळ्यातून एकही अश्रू खाली पडू नये म्हणून ज्या बापाने आपल्या इछांची आहुती दिली , आज तीच मुलगी त्यांना म्हणत होती कि मी तिच्या भावना समजू शकलो नाही म्हणून . मग आजपर्यंत जे मी तिच्यासाठी करत आलो होतो , तिचा प्रत्येक हट्ट पुरवत आलो होतो ते सगळं काय होतं ? आणि आपल्याच काळजाच्या तुकड्याला विसरून जा असं कसं सांगू शकते ती मला .? हे इतकं सोपं आहे का…… ????
धनाजी नेहमी आपल्या पत्नीला मोठ्या गर्वाने सांगत कि एक दिवस माझी नमू माझं नावं मोठं करील आणि लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणतील ," ते बघा नमिताचे वडील चाललेत ". पण आता हेच आठवून त्यांना मरणयातना होत होत्या .
मग त्यांनी आपले पाणावलेले डोळे पुसले आणि दमलेल्या मनाने आणि शरीराने हळू हळू आपल्या घराकडे निघाले . जाता जाता वाटेत त्यांना गणपतीच मंदिर लागलं . आपसूकच त्यांची पावले मंदिराकडे वळली . मग मंदिरात जाऊन ते देवापुढे हाथ जोडून उभे राहिले.आणि प्रार्थना करू लागले नमिताच्या सुखासाठी, म्हणाले," देवा माझी पोर जिथे कुठे असेल तिला माफ कर आणि कायम सुखी ठेव "
इतक्यात त्यांना मागून आवाज आला ," अरे ते बघ नमिताचे वडील …… ती नाही का पळून गेली …… तिचेच हे वडील . "
फ्रेंड्स तुम्हाला मनापासून एक कळकळीची विनंती आहे कि आयुष्यात कधीही आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या आई - वडिलांना चुकूनही दुखवू नका आणि मुलगा असो व मुलगी पण कधीही अस वागू नका जेणेकरून त्यांना समाजात आपली मान खाली घालावी लागेल.
*********हसीम *********

No comments: