Sunday 23 August 2015

अंधार

"अंधार!!"

अंधार!!! ...... किती भयानक असतो ना .. एकदम काळाकुट्ट ... समजा आपण डोळे बंद केले तरीही तो तसाच दिसतो ... काळाकुट्ट अंधार .... म्हणजे बघा हं .. कि .. आपण घरात एकटे आहोत... लाईटही चालू आहे ..सगळीकडे लख्ख प्रकाश आहे... तरीही... दूरवर कुठेतरी काळोख असतोच ना.. म्हणजे जिथवर प्रकाश पोहचत नाही ... तिथे अंधार असतोच की.. उलट तो आधीपासूनच असतो ... प्रकाशात असताना फक्त आपल्याला वाटतं कि अंधार दूर गेला... पण.. तो तिथेच असतो .. आसपास
आता साध्या दिव्याचंच बघा ना .. त्याने कितीही प्रकाश दिला तरी.. तिथेही खाली अंधार लपून बसलेला असतोच ना... म्हणजे काय?... तर कितीही नाही म्हटलं तरी.. अंधार हा असतोच...आपण कुठेही असलो तरी.. कितीही सुरक्षित असलो तरी.... तो दूरवर आपली वाट बघत बसलेला असतोच...कधी ओसाड रस्त्यावर .. तर कधी झाडाझुडपात.... फक्त तो वाट पहात असतो .. आपण तिथे येण्याची.... अहो आता तुम्ही बसल्या जागी खिडकीतून बाहेर पहा.. आहे ना .. "अंधार"... तुमचीच वाट पहातोय तो..
मलाही जाम भिती वाटते अंधाराची... तशी सर्वांनाच वाटते...पण मला जरा जास्तच!!

मी लहान होतो तेव्हा, माझी आई मला दुकानात पाठवायची..हे घेऊन ये .. ते घेऊन ये म्हणून..आमचं घर तसं लांब वस्तीजवळ ... मग मला रानातून गावात  जावं लागायंचं... रानात तर सगळीकडे गर्द झाडी असायची... आणि तोही तिथे सर्वत्र  असायचा...आणि मला घाबरावायचा...मी ऐकून  होतो कि त्या अंधारात "भूत" रहातो.. आणि तो वाट बघत असतो कुणीतरी एकटं भेटण्याची...मग आपण भेटलो कि .. आपल्या नावाची हाक ऐकू येते..आपण मागे वळून पाहिलं कि तो आपली छाती फाडून काळीज खाऊन टाकतो.. कित्येकवेळा हा अंधार मला गिळून टाकायला यायचा .. आणि मी कसाबसा घरी यायचो..

पण तो दिवस अजूनही आठवतो मला... मी असाच काही वस्तू आणायला गेलो होतो.... निघालो तेव्हा सुर्य मावळतीला आला होता... मी पळतंच निघालो कारण अंधार पडायच्या आत मला घरी यायचं होतं..पण उशीर झालाच... मी झपाझप पावले टाकत येत होतो..वाटेच्या आजूबाजूला गर्द झाडी होती व त्यात दडलेला गडद अंधार... घरून निघताना घाईघाईत टॉर्च घ्यायचीच विसरलो होतो... अंधारात लपून बसलेल्या भूताच्या तावडीत आपण सापडलो तर... या विचारानेच मला दरदरून घाम फुटला होता.... आचानक मला वाटले कि कुणीतरी माझा पाठलाग करतंय.. आणि मी चालता चालता पळू लागलो.. मागे वळून पहायची तर हिंम्मतच होत न्हवती माझी...पण माझ्यापेक्षाही तो जोरात पळत होता... कारण त्याच्या पावलांचा आवाज माझ्या जवळ जवळ येत होता... माझ्या नावाने तो हाका मारत होता.. मग तर माझी खात्रीच झाली कि ते भूतंच आहे...मी भितीने किंचाळत पळत सुटलो आणि मला जोरात ठेच लागली आणि मी पडलो.. माझ्या डोक्याला मार बसला व मला गरगरू लागलं.... आणि त्या अंधारात कधी माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली मला कळलंच नाही.

जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा डोक्यावर आईच्या हाताचा स्पर्श जाणवला...बिचारी खुप रडत होती.. तिला वाटलं कि हे सगळं तिच्यामुळेच घडलं होतं...तसं ते खरंच होतं म्हणा... पण आता मी पुर्णपणे शुद्धीवर आलो होतो..डोकं चांगलंच ठणकत होतं.. घरातली लाईट कदाचित गेली होती.. कारण सगळीकडे अजूनही अंधारच होता...तसं त्यावेळी सगळीकडेच लाईट जायची पण आमच्या वस्तीवर जरा जास्तंच.
"अरे वेड्या! ..तुझ्यामागून मीच येत होतो आणि तु मलाच घाबरून पळू लागलास... हे सगळं माझ्यामुळेच घडलं" आणि तो रडू लागला. अंधार असुनही मी त्याचा आवाज ओळखला, तो आमच्या शेजारचा दादा होता... 'म्हणजे मी विनाकारणंच घाबरत होतो .. माझ्या मागे दादा होता... भूत न्हवतं, ज्याला माझी छाती फोडून काळीज खायचं होतं.. मी उगाच घाबरलो...माझं मलाच हसू आलं आणि म्हणालो, "जाऊ दे ना रे दादा .. मीच भित्रा आहे".. मग मी न रहावून विचारलं, " अगं आई लाईट केव्हा येणार गं.. किती अंधार झालाय..काहीच दिसत नाही बघ या अंधारात" क्षणभर सगळीकडे शांतता पसरली.. मग अचानक माझ्या आईने हंबरडा फोडला.. मला काहीच कळेना कि ..नक्की काय चाल्लंय.. मग मला बाबांचा आवाज आला.. काळजीने भरलेला,"बाळा.. आता दुपार आहे.. नक्की काय होतंय तुला?".. पण मी मात्र आता समजून चुकलो होतो...आता रडून काहीच उपयोग न्हवता...

आताही मी अंधारातच आहे...आता तशी त्याची सवय झालीय आणि छान मैत्रिही झालीय .. अंधाराशी.. भूताच्या भितीपायी मी पळालो आणि पडलो.. डोक्याला मार लागला आणि त्याचा परिणाम झाला माझ्या डोळ्यांवर... आता माझ्या आयुष्यात उरलाय तो फक्त आणि फक्त..."अंधार!!"

No comments: