Monday 17 August 2015

आईची माया

मी हसीम आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे जी एका आईच्या ममतेची ओळख करून देणारी आहे .
रात्रीचे ९ वाजले होते.... महेशला त्याच दुकान बंद करायचं होत पण तो वाट पाहत होता... एका बाईची , काय बरं नाव होतं तिचं …।
महेशने कधी तीच नाव विचारलं नाही…. काही दिवसांपूर्वीच महेशने एक शॉप सुरु केलं होतं , तसं ते जास्त मोठं नव्हतं... लहानच होतं त्यात फक्त त्याने काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती.... त्या दिवशी त्याने त्या दुकानचं उद्घाटन केलं आणि पहिलीच गिऱ्हाईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली...
तिच्या कडेवर एक लहान पण खूप गोंडस बाळ होतं.. मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली ," दादा ,आता माझ्याजवळ १० च रुपये आहेत रे बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का?" महेशने एकवार तिच्याकडे पाहिले , गरीब होती बिचारी , कपाळावर कुंकू न्हवतं ना गळ्यात मंगळसूत्र कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज त्याने लावला , साडीला तर अक्षरश: अनेक ठिकाणी ठीगळं लावलेली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते... मग महेशची नजर तिच्या कडेवरच्या त्या लहान सावळ्याश्या निरागस बाळाकडे गेली... त्याच्या त्या मलूल चेहऱ्यावर पण त्याचं ते निरागस हास्य... किती सुंदर दिसत होतं... हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले दोन दात लुकलुकत होते.. त्यामुळे ते बाळ आणखीच गोजीरवाणं दिसत होतं.
मग महेश त्या बाईकडे पाहत म्हणाला ,"ताई … काही हरकत नाही, तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील मला " त्या बाईने मोठ्या समाधानाने महेशकडे पहिले, आणि म्हणाली ," उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला , इथे जवळच राहते मी …. समोर जी छोटी घरं आहेत न तिथल्या दुसर्या गल्लीत एक लहान घर आहे माझं " मग महेश हसत बोलला ,"अहो ताई काही हरकत नाहीये माझी तुम्ही या उद्या "आणि मग ती तिथून निघून गेली .
दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले , महेश ते पैसे तिला परत करत म्हणाला ," ताई पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून … काल तुमच्या हातून माझी पहिली बोहनी झाली आणि मला काल १००० रुपयांचा फायदा झाला ." हे ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला… कारण बर्याच दिवसांनी तिच्या पायगुनाच कोणीतरी कौतुक करत होतं … नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्युनंतर तिच्या सासूने तिला "पांढऱ्या पायाची " म्हणून तिला घरातून हाकलून लावलं होतं . ती म्हणाली ," दादा , रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असत तुमचं ?" महेश म्हणाल ,"रात्री ८ वाजता दुकान बंद करतो मी ताई " हे ऐकून त्या बाईचा चेहराच उतरला .
महेशने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं ," काय झालं ताई ? काही अडचण आहे का?" ती बाई म्हणाली ," दादा या बाळासाठी आणि स्व:तासाठी दोन घरची धुणीभांडी आणि मोलमजुरी करते.... मी रात्री साडेआठ वाजतात मला घरी यायला तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात...माझ्या बाळाला तसंच रडत रडत रात्री उपाशीपोटी झोपावं लागतं.... बोलता येत नाही न त्याला याचाच गैरफायदा घेते मी.... आणि बोलत बोलता तिचा कंठ दाटून आला नी तिचे डोळे पाणावले.. महेशलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं मग तो तिला म्हणाला ," काही काळजी करू नका ताई … तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय दुकान नाही बंद करणार मी …. पण एक अट आहे " त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडे पाहत विचारले ,"काय अट आहे " मग महेश म्हणाला , "तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाहीत " हे ऐकून त्या बाईला पुन्हा गहिवरून आले, पण ह्या वेळी तिच्या डोळ्यातले अश्रू हे दु:खाचे नसून आनंदाचे होते....आज तिला माणसाच्या रुपात देव भेटल्यासारखे वाटत होते . त्या दिवसापसुन रोज रात्री ती बाई या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची , असे करता करता सहा महिने उलटून गेले होते...
पण रोजच्या काबाडकष्टामुळे ती गरीब बाई हळू हळू आजारी पडू लागली होती , हळू हळू तिचे शरीर आणखीनच कृश बनत चालले होते . त्या दिवशीही महेश असाच दुकान आवरून तिच्या येण्याची वाट पाहत होता , घड्याळात तर ९.३० वाजले होते, इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली , महेशने लगेच फ्रीज उघडून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली... आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता, आजारपणामुळे डोळ्यांखालील काळे घेरे खूपच वाढलेले होते.. बाटली देवून महेश फ्रीजचे दार बंद करण्यासाठी मागे वळत तिला म्हणाला ,"काय ताई …. आज खूपच उशीर केला यायला तुम्ही " आणि दर बंद करून त्याने मागे वळून समोर पहिले तर समोर कोणाच न्हवते , त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे घाईगडबडीत लवकर निघून गेली असेल , आणि मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला दुसर्या दिवशी ठीक आठ वाजता ती बाई पुन्हा आली आणि येवून फक्त उभी राहिली मग नेहमीप्रमाणे महेशने तिला फ्रीज मधून दुधाची बाटली काढून टेबलवर ठेवली.. इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली
 म्हणून ती उचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तर त्याच्या लक्षात आलं कि दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती पण का कुणास ठाऊक महेशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत न्हवता , खूपच अशक्त झाली होती ती बाई... तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई ठीक ८ वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली . महेशने आजी तिचा चेहरा जर निरखून पहिला तर तिचा चेहरा पांढराफट् पडला होता , तिच्या चेहर्यावरच तेज तर केव्हाच नाहीसं झाल होतं , महेशला कळून चुकल कि ती बाई खूपच आजारी आणि पैसे नसल्याने ती डॉक्टरकडे गेली नसणार , त्याने लगेच आपल दुकान बंद केलं आणि घरी निघून आला मग त्याने आपल्या बायकोला त्याबाईबद्दल सर्व हकीकत सांगितली , महेशची बायकोसुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली ," चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ व तिचा उपचार करू " महेशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमानही वाटला कारण त्याचीही हीच इच्छा होती .
मग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता... मग ते दोघेही तिच्या घराजवळ आले तर तिथे आजूबाजूला दूर दूर पर्यंत कुणाचेच घर न्हवते नुसती एक लहानशी गल्ली मात्र तिथे होती मग त्या गल्लीतून पुढे गेले तर तिथे हि बाजूला कोणीच न्हवतं फक्त एक हलकासा घाणेरडा वास तिथे येत होता मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार ठोठावलं.... पण दारावर थाप मारताच ते दर चटकन आत लोटलं गेलं मग ते दोघे आत गेले तसा त्या घाणेरड्या वासाच एक जोराचा भपका त्यांच्या नाकात शिरला.. तसा दोघांनीही नाकाला रुमाल लावले , तरीही ते दोघे आणखी आत गेले आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता महेशने चाचपडत कशीबशी त्या खोलीतली लाईट लावली.. तर समोरचे ते भयानक दृश्य पाहून दोघांचेही डोळे विस्फारले... दोघांनाही मोठा धक्का बसला . समोर ती गरीब बाई मरून पडली होती , आणि तिचे शरीर हळू हळू सडू लागले होते , तिच्याकडे पाहून वाटत होते कि ३ - ४ दिवसांपूर्वीच तिने जीव सोडला होता पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहान बाळालाच पाहत होते... तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते , जणू रडून रडून तिच्या डोळ्यातले पाणीच आटून गेले असावे , त्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळे मात्र सजीव असल्यासारखे त्या बाळाकडे एकटक पाहत होते आणि ते निरागस बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहत खेळत होते.. त्या निरागस बाळाला तर हेही कळत न्हवतं कि, त्याच्या आईने केव्हाच आपले प्राण त्यागले आहेत . बाजूलाच ३ रिकाम्यादुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या. जणू त्याला असा विश्वास वाटत होता कि त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही . ते दृश्य पाहून दोघांच्या अंगावर शहारे उभे राहिले . खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी हृद्य हेलावून टाकणारे होते . महेशला तर विश्वासच बसत न्हवत कि गेले २-३ दिवस एका मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून दुध घेऊन जात होता. मग महेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं तिनेही खूप प्रेमाने त्या बाळाला जवळ घेतलं . मग त्या दोघांनीही विधिवत त्या बाईच्या शरीराचे अंत्यसंस्कार केले . आणि त्या बाळाला दोघांनीही दत्तक घेतलं..
महेशला आजही ह्या गोष्टीची जाणीव आहे कि त्या बाळाच्या आईचा आत्मा आजही त्याच्या बरोबरच राहतो .....

No comments: